माणुसकीचा उंबरा...
आभासी शाळा उघडून तिनवार होत आलेत तरी लेकरांचा पुस्तकाकडे कानाडोळा कसा काय? मोबाईलवर क्लास होतोय पण, सहभाग एक अंकी कसाकाय? येरवी पहिलीचे लेकरं पहिल्या दिवशी हजर असतात पण, यावर्षी पन्नास टक्केच प्रवेश कसे काय??
"गावात गेलं पाहिजे...कारणे शोधली पाहीजेत..." म्हणून आज पालक भेटीच्या निमित्ताने घरागणीस उंबरठा गाठला...
" आहेत का लेकरं घरी " म्हणत बाहेरूनच आवाज दिला.... तसे उंबर्याचे मालक अन् मालकीनही "या की सर मधात " म्हणत दारात आले.. काय तो ओलावा ,काय ती आपुलकी.
आज पालक शिक्षक संपर्कातली दिड वर्षे लोटली असली तरीही कोरोनाने निर्माण केलेले सामाजिक अंतर माणुसकीच्या उंबर्याने हद्दपार केल्याचे दिसून आले...
घरागणीस चहा, शब्दातील गोडव्यात शिक्षकांबद्दलचा आदर कपातून सांडत होता.... एका घरी तर शिरा पोहे केले खाल्ले आणि "कितवीला आहेत लेकरं" असे विचारल्यावर सर आमच्या कडे लहान लेकरूच नाही...
"मग चहा पोहे? "
गुरूजी...घरचं शेत नाही म्हणून काय झालं...आपण शेतावर अवलंबून असतोच की..."
" तसं आमच्या गावची लेकरं आपल्या गावातल्या शाळेत शिकतात म्हणून आम्हालाही त्याचा अभिमान वाटायला नको का....!! "
" तुम्ही उंबर्याला आल्यानं बर वाटलं... आज सहा महिने झाले या एकटेपणाला आम्हीच कंटाळलोत... तेव्हा या लेकरांचा जीव काय मनीत असन...."
आम्ही गेल्यावर निपचित पडलेली पाखरे गलबलून उठावीत तसे सुसान गल्लीत नवचैतन्य आले... मुलांनी क्षणात दोस्तायला एकत्र जमविले... अन् पटापट वह्या पुस्तकं घेऊन आले.
चिमुकल्यांचा आनंद तर दप्तरात मावत नव्हता.. "जणू काय सर आपल्याला शाळेतच घेऊन जायला आलेत!!"तसे ते तयार झाले होते.... पण, अजून तरी तसे काही होणार नाही...असे मोठ्यांना समजवतांना त्यांच्याही लक्ष्यात आले.
अभ्यास देतांना "आता करतो सर" असा उत्साह चवकड दिसून आला.
तर मोबाईल नसल्याची सलही काहींना झाकता आली नाही.
"लेकरांच काही तरी करा हो सर" असा पालकांचा गावभर एकसुर दिसला.
खरच ग्रामीण लेकरांच्या शिक्षणाची वाताहत अजूनही सुरूच असल्याचे दिसून आले..
"आॅनलाईन शिक्षण म्हणजे इंधनाशिवाय मोटारगाडी चालवणे किंवा खेळण्यातली बंदूक घेऊन शिकारीला जाण्यासारखे आहे.."
आज शहरी किंवा बोटावर मोजण्याइतके पालक संमातर बाजारी शिक्षणात लेकरांना चार- चार अॅडव्हान्स क्लास लावीत असतांना ग्रामीण लेकरांना साधा मोबाईल मिळू नये यातच भारत इंडियातील दरी फाकत चाललेली दिसून आली..
यातूनही गुरुजी आपल्या लेकरासाठी उंबर्यावर येतात.... लेकरांना बोलतात...
गाव पालकांची कोणतीही तक्रार नाही....उलट
माणुसकीचा उंबरा गुरुजींच्या पाऊलांसाठी आसुसलेलाच दिसला....
पण, या उंबर्यातल्या माणूसकीसाठी इमानदारीने काहीतरी चांगले करणे हे माझ्यासारख्या प्रत्येक नौकरदाराचे कर्तव्य आहे असे मनाला कुठेतरी वाटून गेले...
श्री.शिवदास पोटे सर
प्रा. शिक्षक पिंपळगाव कुटे,
ता. वसमत जि.हिंगोली


0 Comments