छत्रपति शिवाजी महाराज निबंध इन मराठी | शिवाजी निबंध | shivaji maharaj nibandh marathi
स्वतंत्र साम्राज्याचे स्वप्न साकार करणारे स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजीराजे भोसले हे एक थोर कर्तृत्ववान पुरुष होते. त्यांनी शून्यातून केलेली स्वराज्य निर्मिती ही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. शिवाजी महाराज हे आदर्शवत स्वराज्य कारभार करण्यात यशस्वी ठरलेले महाराष्ट्राचे पहिले छत्रपती आहेत.
शिवरायांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ या दिवशी म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० रोजी राजमाता जिजाबाईंच्या पोटी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले तर आईचे नाव जिजाबाई भोसले असे होते. शहाजीराजे हे त्याकाळी सरदार म्हणून कार्यरत होते.
शिवरायांचे बालपण हे अति संस्कारित असे घडले होते. बालपणाची सर्व वर्षे ही नीतिमत्ता, राज्यव्यवस्था, युद्धकला, गनिमी कावा आणि घोडेस्वारी शिकण्यात गेली. कधीकधी आसपास राहणारी मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळत असत. मावळे हेच शिवरायांचे प्रथम सवंगडी होते.
माता जिजाऊ रामायण, महाभारत तसेच इतर भारतीय महापुरुषांच्या कथा बाल शिवाजींना सांगत असत. त्यातूनच मग पराक्रम आणि प्रजादक्षता असे गुण लहानपणीच शिवाजींच्या अंगी बाणवले गेले. शहाजीराजे सतत मोहिमांवर असत पण वेळ मिळाल्यास ते शिवरायांना वाचन, युद्धकला, घोडेबाजी शिकवत असत. सुसंस्कार, शिक्षण, युद्धशास्त्र, राजकारण न्यायशास्त्र, प्रजाहितदक्ष राज्यकारभार यात शिवराय तरबेज झाले. आणि एके दिवशी शिवरायांनी आपले सहकारी, मर्द मावळे यांच्या साहाय्याने महाराष्ट्रात स्वराज्याचे तोरण बांधले. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून त्यांनी प्रजेला भयमुक्त केले.
शिवरायांचे लग्न किशोर वयातच झाले होते. जिजाऊंनी फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील सईबाई हिला भोसले घराण्याची सून म्हणून पसंत केले. शिवराय मोठे होताना त्यांना परकीय सत्तांचा रयतेवर होणारा छळ अनुभवास येत होता. त्यामुळे त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची प्रतिज्ञा घेतली. स्वराज्य स्थापन झाले तरी स्वराज्याभोवती शत्रूचा सुळसुळाट होता. शत्रूचा बंदोबस्त करणे अगत्याचे होते. शिवरायांचे राजकारण धुरंदर, दूरदृष्टीचे होते. अनेक गड किल्ले स्वराज्यात होते. सागरात आरमार जय्यत तयारीत होते.
आदिलशाही, निजामशाही आणि मुघल सत्ता यांच्या विरोधात शिवरायांना लढावे लागणार होते. स्वराज्य निर्मितीची मुहूर्तमेढ म्हणून त्यांनी किल्ले तोरणा अत्यंत लहान वयात जिंकला. त्यांनतर स्वराज्यावर आलेल्या प्रत्येक संकटाला अत्यंत धैर्याने तोंड देण्यात महाराज यशस्वी ठरले.
“अफजलखान वध”, “शायीस्ते खानाची बोटे कापणे” या प्रसंगांतून त्यांचा पराक्रम दिसून येतो. स्वकीय शत्रूंना देखील शिवरायांनी चांगलाच धडा शिकवला. याव्यतिरिक्त पुरंदरचा तह, दिल्लीतील औरंगजेब भेट आणि तेथून सुटका, या बिकट प्रसंगांत संयम आणि धैर्याने केलेला मुकाबला सर्वज्ञात आहे.
शिवरायांना स्वराज्य निर्मिती करता आली ती म्हणजे मावळे आणि योग्य साथीदारांच्या सोबतीने ! प्रत्येक प्रसंगात मावळे जिकीरीने पुढे आले आणि शिवरायांसाठी पर्यायाने स्वराज्यासाठी प्राणाचे मोल चुकवले. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, प्रतापराव गुजर व मुरारबाजी हे शूरवीर तर स्वराज्याच्या स्वप्नासाठी धारातीर्थी पडले.
इ. स. १६७४ मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला. आता संपूर्ण महाराष्ट्रातील रयतेला राजा छत्रपती मिळाला होता. राज्यकारभार व्यवस्थित चालवण्यासाठी शिवरायांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. स्वतंत्र स्वराज्याचे चलन सुरू केले. आरमार व्यवस्था, सुयोग्य कर वसुली, गड किल्ले सुरक्षा आणि विविध पर्यावरणीय मोहिमा राबवल्या. शत्रूचा बीमोड झाल्यावर शिवरायांनी प्रजेच्या कल्याणाकडे लक्ष दिले. प्रजेवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये म्हणून शिवराय दक्ष होते. त्यांच्या राज्यात, न्याय मिळत होता. अपराध्यांना शासन होत होते. शेतकऱ्यांची समस्या दूर होत होती. प्रजेच्या हिताच्या अनेक योजना शिवरायांनी सुरू केल्या होत्या. स्वराज्याचा विस्तार झाला होता. अशा प्रकारे शिवरायांनी प्रजाहितदक्ष राज्यकारभार करून खऱ्या अर्थाने 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' याचा प्रत्यय आणून दिला होता.
शिवाजीराजे असताना त्यांच्या पाठीमागे छत्रपती संभाजी महाराज घडवण्यात शिवराय आणि राजमाता जिजाऊ यांना यश आले होते. तसेच स्वराज्याच्या शाखा संपूर्ण दक्षिण भारतात पसरवण्यात छत्रपती शिवाजी राजे सफल झाले होते. आता परकीय सत्तांनी शिवरायांचे स्वराज्य अस्तित्व मान्य केले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा आणि पराक्रम सर्वत्र दुमदुमत होता. अखेर रायगडावर ३ एप्रिल १६८० रोजी अशा नरवीर युगपुरुषाची प्राणज्योत मालवली. असा हा प्रजादक्ष राजा, राष्ट्रपुरुष शिवाजी महाराज स्वतःच्या कर्तुत्वाने आणि पराक्रमाने “छत्रपती” म्हणून अनंत काळासाठी अजरामर झालेला आहे.
धन्यवाद ! छत्रपती शिवाजी महाराज की जय !
0 Comments