marathwada mukti sangram din bhashan marathi | मराठवाडा मुक्ती संग्राम दिन भाषण-3
marathwada mukti sangram din bhashan marathi, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन भाषण-3
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, महोदय पूज्य गुरूजनवर्ग आणि माझ्या प्रिय वर्ग मित्रांनो या सर्वांना माझा नमस्कार ! आपल्याला सर्वांना माहिती आहे की आज आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. तुम्हा सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, मात्र त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता. त्यावेळच्या 565 पैकी 562 संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शविली आणि तशी कार्यवाही केली. मात्र हैद्राबाद, काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. हैद्राबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान बहादूरनियामुद्दौला निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते . त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैद्राबाद संस्थानात मुक्तीसंग्राम सुरु झाला होता. हैद्राबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या 1 कोटी 60 लाख होती. यात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा कांही भाग येत होता. मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर अनन्वित अत्याचार सुरु केले. दुसर्या बाजूला मुक्ती संग्राम वेगात सुरु झालेला होता. यांच नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, दिंगबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान,भाऊसाहेब वैशंपायन, विजयेंद्ग काबरा, बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते. मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला.यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले.
मराठवाडयात निजामांच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, मराठवाडयाची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिध्द झालेल्या बदनापूर तालुक्यातील धोपटश्र्वर गावच्या दगडाबाई शेळके, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्गजी जाधव, नळदूर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्हयातील होटी गावचे जनार्दन होर्टीकर गुरुजी तसेच परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार, विनायकराव चारठाणकर, विश्र्वनाथराव कातनेश्र्वरकर, नांदेड येथील देवरावजी कवळे,जीवनराव बोधनकर आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या कानाकोपज्यात स्वातंत्र्य संग्राम तेजस्वीपणे लढला गेला. या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, जानकीलालजी राठी, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, किशनसिंग राजपूत, गोविंदराव पानसरे, बहिर्जी बापटीकर, राजाभाऊ वाकड, विश्र्वनाथ भिसे, जयंतराव पाटील आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता काम केले. या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मोल काढणं शक्य नाही. निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर अत्याचार वाढले आहेत हे पाहून 13 सप्टेंबर 1948 रोजी पोलीस ऍक्शन सुरु झाले. मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या. पहाटे 4 वाजता ऑपरेशन सुरु झाल्यावर 2 तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, विजयवाड्याकडील बोनाकल ताब्यात घेतले. चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद तर बुलढाण्याकडेच्या तुकडीने जालना शहर ताब्यात घेतले. दुसरीकडे वरंगल, बीदर विमानतळावर भारतीय फौजांनी हल्ले केले. 15 सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करुन फौजा पुढे निघाल्या. तेंव्हा निजामी सैन्य माघार घ्यायला लागले होते. हैदराबादचे सेनाप्रमुख जन अल इद्गीस यांनी 17 सप्टेंबर1948 रोजी शरणांगती स्वीकारली आणि खुद्द निजाम शरण आला.
हैद्राबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला. हैद्राबाद संस्थानात तिरंगा फडकला. हैद्राबाद संस्थानातील अन्यायी राजवटीविरुध्दचा लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला. स्वातंत्र्य सेनानींनी आपले आयुष्य ज्या कारणांसाठी वेचले, त्याची जाणीव ठेवून मराठवाड्यातील सामाजिक, आर्थिक, कृषीविषयक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा सर्वांगिण प्रगतीसाठी आपणा सर्वांच्या सहकार्यातून विकासाचा मार्ग चोखाळू या.
0 Comments