dr babasaheb bhashan marathi | डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी
![]() |
dr babasaheb bhashan marathi |
सुप्रभात, सर्वांना नमस्कार. आदरणीय प्राचार्य महोदया, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो. आंबेडकर जयंतीनिमित्त आपल्यासमोर भाषण सादर करताना मला खूप आनंद होत आहे. आज मला आपल्या संविधानाचे जनक डॉ भीमराव आंबेडकर यांच्याबद्दल काही ओळी सांगण्याचा मान मिळाला. सर्वप्रथम, मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषणाची ही संधी दिल्याबद्दल मी माझ्या शिक्षकांचे आभार मानू इच्छितो.
भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. बाल भीमाचे वडील रामजी आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून दक्ष असत, त्यांना स्वतः वाचनाची आवड असल्यामुळे घरात ग्रंथसंग्रह हा होताच. मुलांना ही ते चांगली पुस्तके वाचावयास आणून देत असत. म्हणून बाबासाहेबांच्या आयुष्याच्या अंतिम क्षणापावेतो वाचनाची व अभ्यासपूर्ण चिंतनाची सवय त्याच्या ठायी आढळते. तुकाराम महाराज व कबीर बाबासाहेबांच्या अभ्यासाचे विषय भावी आयुष्यात झालेले दिसतात.
डॉ. बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या, विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. गलितगात्र झालेल्या मनामनांतून समाजक्रांतीचे स्फुलींग चेतवून डॉ. आंबेडकर यांनी मुर्दाड झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले.
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी या साठी त्यांनी शिक्षणाचे महत्व समाजात विशद केले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही, असे ते समाज बांधवांना सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे सांगत. प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की, मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाले की, ते पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करुनच बाहेर पडावेत. शासनाने यासाठी लक्ष द्यायला हवे त्यांचे म्हणणे हाते की, समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिक दृष्टाने सशक्त होतो. व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो. प्रज्ञा, शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज त्यांनी प्रतिपादन केलेली आहे. शाळेत मुलांना केवळ बाराखडी शिकवू नये तर मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय बनवावी. समाज हितार्थ या ज्ञानप्राप्त मुलांनी आपली सामाजिक बांधिलकीची कर्तव्ये योग्य व समर्थपणे पार पाडावीत असे शिक्षण असावे. शाळा म्हणजे उत्तम नागरिक व कर्तव्यदक्ष नागरिक बनविणारे कारखाने आहेत. याचे भान या प्रक्रियेत भाग घेणार्यांनी ध्यानी घ्यावे. पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापन १९४६ साली करुन त्यांनी मुंबईला सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलींद महाविद्यालय सुरू केले. राष्ट्रहीत व समाजहीताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय असे ते मानीत.
डॉ. बाबासाहेबांच्या आचार विचारांत राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा भरलेली होती. डॉ.आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा करताच तात्कालीन राष्ट्रीय नेते मंडळी घाबरली त्यांना वाटले डॉ. आंबेडकर आता देश सोडून जाणार परंतु डॉ. आंबेडकरांनी सांगितले, आम्ही या भारतदेशाची संतान आहोत, आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहेच, राष्ट्रावर संकट आल्यास प्राणपणाला लावून देशाचे रक्षण केले व करु सुद्धा यात डॉ. आंबेडकरांची प्रखर राष्ट्रनिष्ठा समावलेली आहे.
एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत, जय भिम.
वाचा - बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी - 1
वाचा - बाबासाहेब आंबेडकर प्रश्न मंजूषा
वाचा - ऑनलाईन निष्ठा 3.0 प्रशिक्षण माध्यम निहाय कोर्स 9, 10 लिंक्स
वाचा - ऑनलाईन निष्ठा 3.0 प्रशिक्षण माध्यम निहाय कोर्स 5, 6, 7, 8 लिंक्स
वाचा - ऑनलाईन निष्ठा 3.0 प्रशिक्षण माध्यम निहाय कोर्स 1, 2, 3, 4 लिंक्स
वाचा - निष्ठा 3.0 प्रशिक्षण नोंदणी कशी करावी
0 Comments