स्वयंपाकघरातील विज्ञान निबंध | राष्ट्रीय विज्ञान दिन 2022
स्वयंपाक घर हे विज्ञानाच्या स्थित्यंतराचे एक महत्त्वाचे केंद्र आहे असे आपण म्हणू शकतो. फार फार प्राचीन काळी जेव्हा एका स्त्रीने शेतीचा शोध लावला तेव्हा पासून स्वयंपाक घरातील पाककृती सातत्याने बदलत गेल्या. बदल प्रचंड आहेत आणि या बदलांचा मागोवा घ्यायचा तर मोठं इतिहासाने भरलेलं वर्णनपर लेखन होईल.आता हेच पहा ना स्वयंपाक घरात आज कितीतरी पदार्थ विराजमान झालेली आहेत.
मसाल्याचे पदार्थ तर एकाहून एक वेगवेगळ्या पद्धतीने आपली भूमिका बजावत आहेत.परंतु ते वापरताना घ्यावयाची काळजी एक कुशल सुगृहिणीलाच शक्य आहे. कारण साधे भातामध्ये पाणी जरी कमी किंवा जास्त झाले तर आपली भाताची पाककृती बिघडण्याची शक्यता असते आणि एखाद्या आमटी किंवा भाजीमध्ये जर आपण एखादा पदार्थ टाकायचा विसरलो तर संपूर्ण पाककृती फसल्यातच जमा होईल. म्हणजेच प्रत्येक पदार्थाचे गुण आणि धर्म हे विज्ञानाधारित आहे. ते त्या ठिकाणच्या स्वयंपाकी व्यक्तीला चांगल्या प्रकारे माहीत असावे लागतात. अर्थात विज्ञान समजून घ्यावे लागते. एका अर्थाने याठिकाणी विज्ञानाच्या प्रयोगशाळेचे नियमच वापरले जातात.स्वयंपाक घर ही एक प्रकारची प्रयोगशाळाच आहे असे महात्मा गांधींनी एकदा म्हटले होते. ते काही खोटे नाही. अगदी फार जुन्या काळापासून ते आजच्या
आधुनिक स्वयंपाक घरापर्यंत स्वयंपाकघर ही विज्ञानाची प्रयोगशाळाच आहे की काय असे आपण म्हणू शकतो अशी स्थिती आहे. स्वयंपाक करताना अनेक पदार्थ लागतात. वेगवेगळ्या प्रकारच्या पाककृती रेसिपी तयार करताना विविध प्रकारची भांडी, मसाले, भाज्या हे घटक वापरताना घ्यावयाची काळजी, प्रत्येक पदार्थाचे प्रमाण हे सगळं विज्ञानाधारित आहे. यादृष्टीने स्वयंपाक घरात काम करणारी व्यक्ती बहुधा ती एखादी स्त्री असते ती एक शास्त्रज्ञ आहे असे मानावे लागेल.
आधुनिक काळाचा विचार करता आपणास स्वयंपाक घरात विज्ञानावर आधारलेली विविध उपकरणे पाहतो परंतु अश्मयुगीन काळापासून चा विचार केला तर मानवाकडे साध्या दगड आणि मातीची उपकरणे होती. पूर्वी आपण पाटा-वरवंटा, पोळपाट-लाटणे, चूल या गोष्टी स्वयंपाक खोलीमध्ये दिसून येत. परंतु आज बघा स्वयंपाक खोली ही वैज्ञानिक उपकरणांनी सज्ज झालेली असते. मिक्सर ग्राइंडर, रेफ्रिजरेटर,फिल्टर,ओव्हन, रोटी मेकर, स्वयंपाकाची गॅस शेगडी इत्यादी यंत्रे किंवा उपकरणे स्वयंपाकघराची एक अत्यावश्यक गरज बनली आहे. ही सर्व उपकरणे वापरता वापरता एखादी अशिक्षित व्यक्तीसुद्धा विज्ञानाचे नियम समजून घेते. कारण प्रयोगच याठिकाणी इतके होत असतात की स्वयंपाक खोली ही प्रयोगशाळा बनलेली असते.पाककृती बनवताना सुरुवातीला एक अल्गोरिदम किंवा क्रमवार कृतींचा संग्रह करावा लागतो. क्रमवार कृतींचा अल्गोरिदम तयार करून पाककृती बनते तेव्हा विज्ञानाधारित विचारसरणीचा पण एक प्रकारे वापर करीत असतो. ज्यांना स्वयंपाक घरातील विज्ञान समजले त्यांना विज्ञान समजले असे आपल्याला म्हणता येते.नवीन पाककृती तयार करताना आपण एक प्रयोग करत असतो. तो प्रयोग म्हणजे प्रयोगशाळेतल्या प्रयोग सारखाच असतो.
विज्ञानाचे वेगवेगळे नियम ध्यानात घेऊन प्रयोगशाळेत होणारा प्रयोग आणि स्वयंपाक घरामध्ये होणारा प्रयोग यात फारसे भिन्नत्व नाही.पाककृती बिघडली तर पुन्हा नियम सुधारून नवे निष्कर्ष काढून पाककृती पुन्हा बनवली जाते. आणि मला सांगा की प्रयोगशाळेत वेगळे काय होते? एखादा प्रयोग करताना त्यामागचे विज्ञान लक्षात घेऊन आपण क्रमवार कृतींचा अल्गोरिदम तयार करून तो प्रयोग नियंत्रित वातावरणात करत असताना प्रयोग झाल्यानंतर त्याचे निष्कर्ष आपण नोंदवत असतो. या निष्कर्षानुसार पुन्हा पुन्हा प्रयोग करून आपण प्रयोगांमध्ये अचूकता आणून तो प्रयोग यशस्वी करतो. यशस्वी झालेली पाककृती आणि प्रयोग हे एकाच नाण्याच्या जणू दोन बाजू आहेत. या दृष्टीने विचार केला तर स्वयंपाकघर ही एक प्रकारची विज्ञानाची प्रयोगशाळाच आहे.
0 Comments