शाहू महाराज कार्य | shahu maharaj yanche karya
![]() |
शाहू महाराज कार्य | shahu maharaj yanche karya |
❇️ शाहू महाराजांचे कार्य :-👇
शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापन केली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेले वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्याच काळात झाले.
‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.
शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांना 'राजर्षी' ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली.
स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षे आधी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली. म्हणूनच त्यांचा देशभरात 'महाराजांचे महाराज' असा गौरव होतो. रयत प्रजा व उपेक्षित समाजाला त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याचे कार्य शाहूंनी केले आपल्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये त्यांनी समाजातील बहुजन समाजाला त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या अधिकाराचा पूर्णपणे वापर केला म्हणूनच ते लोककल्याणकारी राज्यकर्ते ठरले. त्यांच्या कार्याचा गौरव समकालीन लेखकांनी व इतिहासकारांनी केलेला आहे.
महाराजांनी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. शाहू राजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी तळमळ होती. म्हणून कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. तसेच ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना १ रू. दंड आकरण्याची कायदेशीर तरतूद केली. त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. अस्पृश्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने शाहू महाराजांनी अस्पृश्यांना स्वावलंबी बनवण्याचे ठरवले. त्यासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले, दुकाने हॉटेल्स काढण्यासाठी प्रोत्साहन दिले, तसेच आर्थिक मदत देखील देऊ केली. अस्पृश्यांना शिवण यंत्रे देऊन स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले राजवाड्यातील कपडे त्यांच्याकडून शिवून घेण्यास सुरुवात केली गंगाधर कांबळे या व्यक्तीला कोल्हापुरात मध्य वस्तीत चहाचे दुकान काढून दिले.
धन्यवाद,,,!!!
0 Comments