Subscribe Us

जिल्हांतर्गत बदली शासन निर्णय प्रक्रिया कार्यपध्दती टप्पा क्र. 1 ते 6 | zpps tech guruji

जिल्हांतर्गत बदली शासन निर्णय प्रक्रिया कार्यपध्दती टप्पा क्र. 1 ते 6 | zpps tech guruji

मार्गदर्शक व्हिडिओ पहा.👇👇

Video Credit :- Anil Kamble Sir, Nanded

बदली प्रक्रिया कार्यपध्दती :-

४.१ टप्पा क्र.१ :- 👇👇

ज्या शाळांमध्ये ठेवावयाच्या रिक्त पदापेक्षा कमी पदे रिक्त असल्यास अशा शाळांमध्ये जर बदलीपात्र शिक्षक असतील तर अशा शिक्षकांची बदली त्या शाळेतून करण्यात येईल. तथापि, अशा शाळांमध्ये बदलीपात्र शिक्षक नसतील तर खाली नमूद केलेल्या प्रक्रियेप्रमाणे त्यांचा बदलीपात्र शिक्षकांच्या यादीमध्ये समावेश करण्यात येईल. उदा.:- एखाद्या शाळेत १० शिक्षकांचा मंजूर आकृतीबंध आहे. मुद्दा क्र.२.३ नुसार या शाळांमध्ये शिक्षकांच्या तीन जागा रिक्त ठेवावयाच्या आहेत. सद्य:स्थितीत या शाळेत एकच पद रिक्त आहे. त्यामुळे आणखी दोन शिक्षकांची पदे रिक्त ठेवणे आवश्यक आहे.

४.१.१ ज्या शाळेत तीन बदली पात्र शिक्षक आहेत. अशा वेळी तेथील दोन बदलीपात्र शिक्षकांची बदलीसाठी निश्चित धरावयाच्या सेवेच्या सेवाजेष्ठतेनुसार बदली करण्यात येईल व अशा पध्दतीने मुद्दा क्र.२.३ नुसार तीन जागा रिक्त ठेवण्यात येतील.

४.१.२. शाळेत एकच बदली पात्र शिक्षक आहे अशावेळी त्या एका शिक्षकाची बदली होईल व एकूण दोन पदे त्या शाळेत रिक्त राहतील. 

विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ ची संपूर्ण महितीसाठी खालील विडियो पहा.👇


Video Credit :- Anil Kamble Sir, Nanded

४.२ टप्पा क्र. २ :- विशेष संवर्ग शिक्षक भाग -१ यांच्या बदल्या :-

४.२.१. टप्पा क्र.१ प्रमाणे कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व विशेष संवर्ग-१ शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी (Submit) चार दिवसांचा अवधी देण्यात येईल. तद्नंतर विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ यांच्या बदल्या करण्यात याव्यात.

४.२.२. विशेष संवर्ग माग- १ शिक्षकांना केवळ त्यांच्या विनंतीवरुनच बदली देण्यात येईल. ज्या विशेष संवर्गातील शिक्षकांना बदली नको असेल, मात्र त्यांचे नाव बदलीस पात्र शिक्षकांच्या यादीत आले असल्यास त्यांनी सोबत जोडलेल्या विवरणपत्र क्र. ३ मध्ये स्वयंघोषित प्रमाणपत्र देणे आवश्यक राहील.

४.२.३. विशेष संवगांतर्गत विनंती बदलीसाठीचा प्राधान्यक्रम हा विशेष संवर्ग शिक्षकांच्या वरील व्याख्येमध्ये नमूद केलेल्या क्रमवारीनुसार राहील.

४.२.४. एखाद्या विशिष्ट संवर्गामध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी विनंती बदली मागितली असल्यास त्यांच्या सेवाज्येष्ठता विचारात घेऊन जेष्ठ कर्मचार्‍यास प्रथमतः बदली अनुज्ञेय राहील. 

४.२.५. सेवाज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचार्‍यास प्राधान्याने बदली अनुज्ञेय राहील. 

४.२.६. या संवर्गातील शिक्षकांचे बदल्यांसाठी प्राधान्यक्रमानुसार यादी तयार करण्यात येईल. या यादीच्या आधारे बदली करताना, शिक्षकांचा पसंतीक्रम विचारात घेऊन ज्या शाळांमध्ये बदलीस पात्र शिक्षक उपलब्ध असतील त्या शाळेत प्राधान्यानुसार शिक्षकांची बदली करण्यात येईल. जर एखाद्या विशेष संवर्ग शिक्षकाला त्यांच्या पसंतीक्रमाप्रमाणे एकाही शाळेमध्ये (तेथे बदलीस पात्र शिक्षक उपलब्ध नसल्याने) बदली देता आली नाही तर त्याची बदली होणार नाही.

४.२.७ विशेष संवर्ग भाग -१ अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकांना पुढील तीन वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही.

४.२.८ विशेषसंवर्ग भाग -१ मध्ये गणले जाण्यासाठी संबंधित शिक्षकांनी त्याबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे अनिवार्य राहील. सदरच्या अर्जाच्या पात्रतेबाबत संबंधित गटाचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व तालुका आरोग अधिकारी यांची समिती निर्णय घेईल. 

पती-पत्नी एकत्रीकरण संपूर्ण महितीसाठी खालील विडियो पहा.👇


Video Credit:- Anil Kamble Sir, Nanded

टप्पा क्र.३ - विशेष संवर्ग शिक्षक भाग -२ यांच्या बदल्या :-

४.३.१ टप्पा क्र. २ प्रमाणे कार्यवाही झाल्यानंतर सुधारित रिक्त जागाची यादी जाहीर करण्यात यावी व विशेष संवर्ग भाग-२ शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी (Submit) चार दिवसांचा अवधी देण्यात येईल. तदनंतर विशेष संवर्ग शिक्षक भाग -२ यांच्या बदल्या करण्यात याव्यात. 

४.३.२. जे शिक्षक विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ मध्ये मोडतात त्यांनी विवरणपत्र क्र. ४ मधील नमुन्यात स्वयंघोषीत प्रमाणपत्र दोघांच्या स्वाक्षरीने सादर करणे आवश्यक आहे.

४.३.३. जर दोघेही जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर दोघांपैकी एकच या संवर्गासाठी अर्ज करु शकेल.

४.३.४. उपरोक्त प्रमाणे पती-पत्नी एकत्रीकरण झाल्यावर संबंधित कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी या शासन निर्णयातील नमुद केलेल्या कार्यपध्दती लागू होतील. या तरतुदीप्रमाणे संबंधिताची बदली पात्र सेवा झाल्यानंतर त्यांची पुढील बदली करताना उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे त्यांना एक एकक (one unit) मानून बदलीने नियुक्ती देता येईल. पर्यायाने ज्या ठिकाणी दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी अन्यथा ३० कि.मी. परिसरात दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी शक्यतो त्यांची बदली केली जाईल. जर दोघे पती पत्नी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर एकत्रीकरण झाल्यानंतर त्या दोघांना एक एकक म्हणून विचारात घ्यावयाचे आहे. यापैकी एकाची पण १० वर्ष सलग सेवा झाली असल्यास दोघांना बदलीस पात्र धरण्यात येईल.

४.३.५.)   ३० कि.मी. रस्त्यांचे अंतर हे सर्वात नजीकच्या मार्गाने ग्राह्य धरण्यात यावे. सदरचे ३० कि.मी. रस्त्याच्या अंतराचा दाखला देण्यास कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग/कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, बांधकाम हे सक्षम प्राधिकारी रहातील. 

४.३.६. विशेष संवर्ग २ च्या खाली बदली घेतल्यास पुढील तीन वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही.

संवर्ग-३ बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक/अवघड क्षेत्रातील शिक्षकांच्या बदल्या संपूर्ण महिती व्हिडिओ पहा.👇👇


Video Credit :- Anil Kamble Sir, Nanded

४.४. टप्पा क्र. ४ बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या बदल्या :-

४.४.१. टप्पा क्र.३ प्रमाणे कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व बदली अधिकारप्राप्त शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी (Submit) चार दिवसांचा अवधी देण्यात येईल. तद्नंतर बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या बदल्या करण्यात येतील. 

४.४.२. यासाठी ज्या बदली अधिकारप्राप्त शिक्षकांची ३ वर्षांची बदली करावयाची निश्चित धरावयाची अवघड क्षेत्रातील सेवा पूर्ण झाली असेल अशा शिक्षकांनी बदलीसाठी विवरणपत्र १ मध्ये अर्ज करणे आवश्यक आहे.

४.४.३ सदर कर्मचाऱ्याच्या बदल्या ह्या त्यांच्या बदल्यासाठी पात्र धरावयाच्या सेवा ज्येष्ठतेनुसार करण्यात येतील.

४.४.४ सेवा ज्येष्ठता समान असल्यास वयाने जेष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास बदली अनुज्ञेय राहील.

४.४.५ बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या बदल्या ह्या बदलीपात्र शिक्षकांच्या जागेवर त्यांच्या विनंतीतील प्राधान्यक्रमानुसार केल्या जातील.

४.४.६ बदली अधिकार पात्र शिक्षकांनी जर बदलीसाठी पसंतीक्रम दिला नाही आणि जर हे शिक्षक बदलीस पात्र नसतील तर त्यांची बदली होणार नाही.

बदलीस पात्र शिक्षक व  विस्थापित शिक्षकांची बदली करण्याची कार्यपध्दती संपूर्ण महितीसाठी खालील विडियो पहा.👇

Video Credit :- Anil Kamble Sir, Nanded

४.५. टप्पा क्र. ५ :- बदलीस पात्र शिक्षकांची बदली करण्याची कार्यपध्दती -

४.५.१. टप्पा क्र. १,२,३ व ४ मध्ये नमुद केलेल्या कार्यपध्दतीमुळे बदली होत असलेले व बदलीस पात्र शिक्षक यांची एक ज्येष्ठतायादी, जिल्हा परिषदेतील एकूण सेवा विचारात घेऊन करण्यात येईल. सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व शिल्लक शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी (Submit) चार दिवसांचा अवधी देण्यात येईल. 

४.५.२. सेवाज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास बदली प्राधान्याने अनुज्ञेय राहील.

४.५.३. या यादीतील शिक्षकांच्या त्यांच्या प्राध्यान्यक्रमाने व त्यांच्या पसंतीनुसार बदल्या करण्यात येतील. परंतु ह्या शिक्षकांची बदली ही ते ज्या शाळेत जाण्यास इच्छुक आहेत त्या शाळेत ठेवावयाच्या रिक्त जागा सोडून अन्य रिक्त जागा असतील, त्याच रिक्त पदांवर बदली होऊ शकते.

४.५.४ या शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास व वरीलप्रमाणे बदली होत असल्यास उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल.

४.५.५. सर्व शिक्षकांना किमान ३० अथवा टप्पा क्र. ४ ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील.

४.६ टप्पा क्र. ६ :- विस्थापित शिक्षकांसाठी शेवटचा टप्पा :-

टप्पा क्र. ५ पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व टप्पा क्र.५ मधून उरलेल्या शिक्षकांना त्यांना पसंतीक्रमामध्ये बदल करण्यासाठी चार दिवसांचा कालावधी देण्यात येईल. टप्पा क्र. ५ नुसार सर्वांची सेवाज्येष्ठता व पसंतीक्रमानुसार बदली करण्यात यावी. सर्व शिक्षकांना किमान ३० अथवा टप्पा क्र. ५ ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील. या शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास किंवा त्यांच्या प्राधान्यक्रमाप्रमाणे जागा उपलब्ध नसल्यास व वरीलप्रमाणे बदली होत असल्यास उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल.

४.७ कार्यमुक्तीचे आदेश :

बदलीने पदस्थापनेचे आदेश निर्गमित करताना त्यामध्ये कार्यमुक्तीचा दिनांक नमूद करण्यात यावा. कार्यमुक्तीच्या दिनांकानंतर ते बदली होण्यापूर्वी ज्या ठिकाणी कार्यरत होते त्या ठिकाणावरून त्यांचे वेतन अथवा कोणतीही देयके अदा करु नयेत. बदलीनंतर संबंधित शिक्षक बदलीच्या ठिकाणी रुजू होत नसेल तर अशा शिक्षकाविरुध्द मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करावी.

५. इतर धोरणात्मक बाबी :

५.१ शिक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या ह्या ऑनलाईन पध्दतीनेच करण्याचा निर्णय शासन घेत आहे. यासाठी खालील प्रमाणे कार्यपध्दती अवलंबण्यात यावी.

५.१.१. राज्य स्तरावर शिक्षकांच्या ऑनलाईन पध्दतीने बदल्यांसाठी एक नोडल ऑफीसरची नेमणूक करण्यात येईल,

५.१.२. तांत्रिक बाबींसाठी एक कार्यक्रम अधिकारी यांची नेमणूक करण्यात यावी. जिल्हा स्तरावरील सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्याची त्यांची जबाबदारी राहील. 

५.२ मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रत्येक शिक्षकाचा पसंतीक्रम दिसेल. शिक्षकांच्या बदल्या झाल्यानंतर संबंधित संगणक यंत्रणेने बदलीच्या पूर्ण प्रक्रियेची सविस्तर माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांना उपलब्ध करून द्यावी,

५.३ बदली ही संपूर्णपणे प्रशासकीय स्वरुपाची बाब असल्यामुळे कोणत्याही कर्मचाऱ्याने राजकीय दबाव वापरल्यास महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ मधील नियम ६(५) चा भंग केला म्हणून ती कृती शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र राहील. 

५.४ विनंती बदल्यांसाठी कोणतेही भत्ते व पदग्रहण अवधी अनुज्ञेय राहणार नाही.

५.५ प्रशासकीय अथवा विनंती बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना तात्पुरती प्रतिनियुक्ती अशा मार्गाने त्यांच्या पूर्वीच्या नियुक्तीच्या ठिकाणी किंवा कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक सोयीसाठी इतरत्र पदस्थापना देऊ नये. या प्रकारचा प्रयत्न बदलीतील अवैधता/अनियमितता समजून संबंधित अधिकारी शिस्तभंग कारवाईस पात्र होतील.

५.६ जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना बदल्या सामान्यपणे वर्षातून एकदाच दिनांक १ मे ते ३१ मे पर्यंत करण्यात याव्यात.

५.७ काही शिक्षकांनी त्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यासंदर्भात मा.उच्च वा सक्षम न्यायालयात दावा दाखल केला असल्यास अशा प्रकरणात मा. उच्च न्यायालय वा सक्षम न्यायालयाने दिलेल्या आदेशाची सर्वप्रथम अंमलबजावणी करावी व तद्नंतर या शासन निर्णयानुसार जिल्हांतर्गत बदल्याबाबत पुढील कार्यवाही सुरु करावी.

५.८ आरटीई ऍक्टनुसार जिल्हा परिषद शाळांमध्ये कोणत्याही परिस्थितीत १० टक्क्यांपेक्षा जास्त जागा रिक्त ठेवणे शक्य नाही. त्यामुळे समानीकरणाचे धोरण सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी नियमानुसार राबविण्यात येईल, याची दक्षता घ्यावी. समानीकरणाच्या जागा निश्चित करण्यासाठी संबंधित जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित जिल्हा परिषदांचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि.) व  शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांची समिती गठीत करण्यात यावी. समानीकरणासाठी कोणत्या जागा निश्चित कराव्यात, याबाबतचा निर्णय सदर समितीने घ्यावा.

५.९ जिल्हा परिषद शिक्षकांच्या होणाऱ्या जिल्हांतर्गत बदलीच्या प्रचलित संगणकीय प्रक्रियेच्या प्रस्तावित शासन निर्णयामध्ये दिनांक १ मे ते ३१ मे पर्यंत बदली प्रक्रिया पुर्ण करण्याबाबत सूचित केले आहे. परंतु त्या व्यतिरिक्त काही अपरिहार्य व योग्य कारणास्तव (प्रसुती रजेवर, बाल संगोपन रजेवर, गंभीर अपघातामुळे किंवा इतर बाबी) बदली करावयाची झाल्यास ती बदली न करता प्रतिनियुक्ती करण्यात यावी. सदर प्रतिनियुक्ती ही विभागीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लेखी मान्यतेने करण्यात यावी. 

प्रतिनियुक्ती करताना खालील बाबींचा विचार होणे आवश्यक आहे. :

१) बदली प्रक्रिया पुर्ण झाल्यावर होणाऱ्या रिक्त पदावर प्रतिनियुक्ती करण्यात यावी.

२) त्याठिकाणी शैक्षणिक अडचण होणार नाही, याची खात्री शिक्षणाधिकारी यांनी करावी. 

३) एक महिन्यात प्रतिनियुक्ती मागणी करणाऱ्या शिक्षकांचे अर्ज मागवून शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी यादी तयार करावी.

४) कोणकोणते शिक्षक प्रतिनियुक्तीस पात्र आहेत. हे ठरविण्याबाबत जिल्हा स्तरावर खालीलप्रमाणे समिती नियुक्त करण्यात यावी. 

(१) उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) जिल्हा परिषद - अध्यक्ष

(२) शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद - सदस्य

(३) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, - सदस्य

५) समितीने पात्र ठरविलेल्या शिक्षकांमधून सेवा जेष्ठतेने एका जागेसाठी तीन शिक्षकांचे प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत विभागीय आयुक्त यांना सादर करण्यात येतील. विभागीय आयुक्त हे सादर केलेल्या प्रस्तावातील एक जागेसाठी एका शिक्षकाला प्रतिनियुक्ती देण्याबाबत कार्यवाही करतील.

६) सदर प्रतिनियुक्ती ही पाच वर्षातून एकदा देता येईल. 

७) प्रतिनियुक्ती दिल्यानंतर संबंधित शिक्षक पुढील वर्षाच्या बदली (१ ते ३१ मे) होणाऱ्या प्रक्रियेमध्ये सेवा जेष्ठतेनुसार बदलीस पात्र होईल.

८) प्रतिनियुक्ती दिल्यांनतर त्यांची नियुक्ती ज्याठिकाणी असेल त्या ठिकाणची मूळ सेवा धरण्यात येईल.

५.१० बदल्यांबाबतच्या अनियमिततेबाबतची तक्रार

५.१०.१ संगणकीय प्रणालीद्वारे निर्गमित झालेल्या आदेशाच्या विरोधात बदलीच्या अनियमिततेबाबत तक्रार असल्यास त्याचा निपटारा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावर झाल्यास संबंधित शिक्षकांना जिल्हा परिषद स्तरावरच सत्वर न्याय मिळू शकतो. यासाठी जिल्हांतर्गत बदलीमध्ये शिक्षकांची तक्रार असल्यास सदरच्या तक्रारींची चौकशी करून वारण करण्यासाठी मुख्य अधिकारी यांच्या स्तरावर एक समिती गठीत करण्यात येत आहे. सदर समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग), शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचा समावेश असेल. बदलीचे आदेश प्राप्त झाल्यापासून संबंधित शिक्षकांनी सात दिवसाच्या आत बदलीबाबत तक्रार असल्यास या समितीकडे तक्रार अर्ज दाखल करावा. तक्रारीच्या संबंधात समितीने चौकशी करुन ३० दिवसाचे आत निर्णय घेण्यात यावा. परंतू बदलीबाबतची तक्रार तपासत असताना गैरसोयीची नियुक्ती म्हणजे बदल्यांमधील अनियमितता नव्हे, असे प्रामुख्याने स्पष्ट करण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत घोषित करण्यात आलेल्या अनिवार्य रिक्त जागेवर शिक्षकांची समुपदेशनाने नियुक्ती करता येणार नाही. कारण समानीकरणाचे धोरण हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कासाठी आवश्यक आहे.

५.१०.२ मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समितीने घेतलेल्या निर्णयाने समाधान न झाल्यास संबंधित शिक्षक बदलीच्या अनियमितेबाबत विभागीय आयुक्त कार्यकारी अधिकारी यांचे आदेश प्राप्त झाल्यापासून ७ दिवसाचे आत दाद मागू शकतात. अशा पध्दतीने विभागीय आयुक्त यांच्याकडे दाखल झालेल्या अपीलवजा तक्रारीवर शक्यतो तक्रार प्राप्त झाल्यानंतर पुढील ३० दिवसांचे आत विभागीय आयुक्तांनी निर्णय घ्यावयाचा आहे. विभागीय आयुक्तांनी घेतलेला निर्णय अंतिम राहील.

५.१०.३ वरीलप्रमाणे बदलीच्या आदेशाच्या विरुध्द अपिलीय प्रक्रिया सुरु असताना जर शैक्षणिक वर्ष आरंभ झाले तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अपिलीय प्रक्रियेला बाधा न येता व शिक्षकांचे अपिलीय अधिकार अबाधीत ठेवून शिक्षकांना त्यांना नेमून दिलेल्या पदस्थापनेवर हजर होऊन शैक्षणिक कर्तव्ये बजावणे बंधनकारक राहील.

५.१०.४ विशेष संवर्ग भाग-१ व विशेष संवर्ग भाग-२ मध्ये ज्या शिक्षकांनी अर्ज भरून बदली करुन घेतलेली आहे व त्या शिक्षकांबद्दल तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. अशा शिक्षकांची बदलीच्या संबंधित संवर्गाच्या कागदपत्रांची तात्काळ पडताळणी करण्यात यावी. ही पडताळणी करताना नैसर्गिक न्याय म्हणून त्यांना म्हणणे मांडण्यासाठी सात दिवसांचा अवधी देण्यात यावा.

५.१०.५ अशी पडताळणी करताना एखाद्या शिक्षकाने जाणीवपूर्वक खोटी व दिशाभूल करणारी माहिती भरुन बदली करून घेतलेली आहे, अशी बाब आढळल्यास संबंधित शिक्षकाचे निलंबन करून त्याच्या विरुध्द शिस्तभंगाची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रस्तावित करावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या wwwww.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेताक २०२१०४०४११४७५६११२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(विजय चांदेकर) 

उप सचिव, ग्रामविकास विभाग


वाचा - जिल्हांतर्गत शिक्षक बदली 2021-22 पदावधीची परिगणना दिनांक ३१ मे ऐवजी दिनांक ३० जून

🔰 आपणास हे ही आवडेल ➡️ विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ ची संपूर्ण महिती

🔰 आपणास हे ही आवडेल ➡️ विशेष संवर्ग शिक्षक भाग-2 ची संपूर्ण महिती

🔰 आपणास हे ही आवडेल ➡️ विशेष संवर्ग शिक्षक भाग-3 ची संपूर्ण महिती

✳️ 7 एप्रिल 2021 चा शासन निर्णय पहा.👇


Post a Comment

0 Comments