अपार कष्टाचे मूर्तीमंत प्रतिक... माय कष्टांगना स्व. अंजनाबाई रावजी कोठेवाड कलंबरकर
अपार कष्टाचे मूर्तीमंत प्रतिक... माय कष्टांगना स्व. अंजनाबाई रावजी कोठेवाड कलंबरकर १९ वा स्मृतीदिन निमित्त...
मायींच्या काबाडकष्टावर कितीही ग्रंथ लिहावेत एवढा अफाट आशय सापडतो... माझ्या मायीचे जगणं... वागणं.. बोलणं... स्वाभीमान... ताठ कणा... स्थितप्रज्ञता... कितीही मोठ्या संकटांच्या छातीवर पाय रोवून उभा राहण्याचे बळ अलोट...!
डोक्यावर पदर आहे की नाही याचे भान कधीच नसायचे. बेभान होऊन कधी डोक्यावर जळतनाचा भारा तर नियमित चाऱ्याचा भारा, कमरेवर धुण्याचे टोपलं. त्याच हातात रिकामी पाण्याची कळशी... ऊन, वारा, पाऊसाला माझ्या मायीला कधीच अडवता आले नाही. अनवाणी कष्ट उपसताना मायीच्या पायाला काटा, कुप, चिखल, फुफुरड्याला वेदना देता आले नाही ! लोखंडी पायं.
पार्डी खु. ता. वसमत कर्तव्याच्या गावी अशी स्त्री प्रतिमा दिसली की, आपोआपच माय माऊलींच्या चरणांवर डोकं झुकतं... अफाट इच्छा शक्ती, निर्भिडपणा, प्रचंड मनोबल. गायी, म्हशी, दूध, दही, तूप हेच मायीचे उत्पादनाची साधनं... शेत मजुरी, चार बाईंना गोळा करून निंदन खुरपणाची, पीक कापणी, काढणींची गुत्ते घेणारच. शेतीतील चिंचा, चिंचोके, बोरं, आंबे, कापसाच्या चुकीत लावलेली वांगी, टमाटे, मिरची, मिरगाला बांधावर टोबवलेली दोडकी, कदू, कारली, देवडांगर, भेंडी, चवळी पिकांच्या मध्यभागी लावलेला पाटा यातून कधीच भाजीपाला विकत घ्यावा लागला नाही. गरजूंना विकत, कधी फुकट यातूनही पै-पैसा जमवण्याचे तंत्र अफलातूनच. उन्हाळ्यासाठी त्यासर्व वाणांच्या उसऱ्यांचा उपयोग केवढे मोठे अर्थकारण!
माय... आता काहीच राहिले नाही... काहीही करून सण-वार, रित-रिवाज, परंपरा-प्रथांचे कडेकोट पालन करणारच...! वैभवाचे दिवस आल्यावर दिलेले तेच १००, २०० रुपये जशास तसे कमरेला ठेवून आठ-पंधरा दिवसांनी गावी गेलं की मलाच परत द्यायची. तुझ्या लेकरांसाठी शेप, पेंड खजूर घे. त्याच नोटा परत. केवढा हा त्याग. खरंच आई-वडिलांना मुलांकडून काहीच लागत नाही. केवळ प्रेमाचे दोन शब्द आणि भलं बुरं विचारण्याची आशा, हे मला तेव्हाच उमगलं...!
लग्नकार्य असलं की आजही आठवणींने डोळे पाणावतात! सिमग्याच्या सणाच्या दिवशी घडलेली अतिशय वाईट अन् काळजाची चाळणी करणारी घटना... आजही सिमगा आला की काळीज धडधड करते, पाय थरथरतात, मन सुन्न होऊन जाते! तूच लावलेला कर्मव्रताचा वृक्ष आम्ही सर्व कुटुंबीय अथक कष्टाने विस्तारत आहोत!
दोन दशकं होत आली माय तुला जाऊन...! काल परवाच तर होती आता कोठं येवू पाहून...!! तूझी शिकवण तूझे आशीर्वाद सदैव आमच्या डोईवर...!!
- दादाराव कोठेवाड-कलंबरकर
0 Comments